केंद्रप्रमुख पदाची कर्तव्य व कामकाजाची पद्धती kendrapramukha kartavya and working method
प्राथमिक शिक्षण हे बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी समाज परिवर्तनासाठी व राष्ट्रीय विकासाकरिता एक महत्त्वाचे साधन आहे. सर्वोच्च न्यायालयाने उन्नीकृष्णन खटला प्रकरणी निकाल देताना असे आदेश दिले होते की, घटनेच्या कलम २१ प्रमाणे प्रत्येकाला जीवन जगण्याचा हक्क, गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण मिळाल्याशिवाय मिळणार नाही. त्यानुसार केंद्रशासनाने ८६ वी घटनादुरुस्ती करून कलम २१-ए द्वारे ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची राज्यघटनेद्वारे तरतूद केली.
महाराष्ट्रात प्राथमिक शाळांचे प्रशासकीय व शैक्षणिक सनियंत्रिण योग्य व प्रभावी होण्यासाठी ४,८६० केंद्रीय प्राथमिक शाळा निश्चित करून त्या शाळांवर केंद्र प्रमुखांची नेमणूक करण्यात आली. सन १९८६ चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी कृती कार्यक्रम हाती घेण्याचे राज्यांना सूचित करण्यात आले होते. त्यादृष्टीने महाराष्ट्रात केंद्रीय प्राथमिक शाळा व केंद्र प्रमुख पदाची निर्मिती १९९४
मध्ये करण्यात आली.
शासनाने विहित केलेल्या निकषांनुसार सर्वसाधारणपणे जिल्हा परिषदेच्या १० प्राथमिकं शाळांच्या समूहासाठी १ केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करून त्या शाळांच्या नियंत्रणासाठी केंद्र प्रमुख नेमला जातो. दुर्गम आदिवासी डोंगराळ भाग लक्षात घेऊन काही ठिकाणी ८ प्राथमिक शाळांसाठी केंद्र प्रमुख नेमले जातात. ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या १० जून, २०१४ रोजीच्या अधिसूचनेनुसार केंद्र प्रमुखाची रिक्त पदे ही सरळसेवेतून परीक्षेद्वारे ४० टक्के, विभागीय परीक्षेद्वारे ३० टक्के व सेवाजेष्ठतेने ३० टक्के भरली जाणार आहेत. त्यादृष्टीने अलीकडेच ९ सप्टेंबर, २०१९ च्या शासन निर्णयाद्वारे केंद्र प्रमुख परीक्षा पेपर एक व पेपर दोनचा विस्तारित अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला आहे.
केंद्र प्रमुख पद निर्माण करण्याची उद्दिष्टे
महाराष्ट्र राज्यात १४ नोव्हेंबर, १९९४ च्या शासन निर्णयाद्वारे ४,८६० केंद्र प्रमुख पदांची निर्मिती करण्यात आली होती. प्राथमिक स्तरावरील शिक्षकांना मार्गदर्शनाचे काम करणे
व प्राथमिक शाळांचा दर्जा उंचावण्यात केंद्र प्रमुखाची भूमिका महत्त्वाची असते. केंद्र प्रमुख पदाची निर्मिती करण्याची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत.
• केंद्रशाळा समूहातील प्राथमिक शाळांचे शैक्षणिक सनियंत्रण करणे.
प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे.
६ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांना नजिकच्या शाळेत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे.
समूहातील प्राथमिक शाळांना मासिक व वार्षिक उद्दिष्टे ठरवून देणे.
समूहातील प्राथमिक शाळांचे निरीक्षण व पर्यवेक्षण करणे. प्राथमिक शाळांचा दर्जा उंचाविण्यासाठी गट संमेलन आयोजित करणे.
शासनाच्या विविध योजनांची माहिती शिक्षकांना देणे. विद्यार्थ्यांच्या संपादणुकीचे मूल्यमापन करण्याबाबत शिक्षकांना प्रशिक्षण देणे. ग्रामशिक्षण समित्यांना मार्गदर्शन करणे.
1) शिक्षक-पालक भेटीचे आयोजन करणे.
) शैक्षणिक साहित्याच्या प्रभावी वापरासाठी शिक्षकांना मार्गदर्शन करणे.
केंद्र प्रमुखांच्या पर्यवेक्षणाचे स्वरूप
प्राथमिक शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी व प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी केंद्र प्रमुखांच्या पर्यवेक्षणाची भूमिका महत्त्वाची आहे. केंद्र प्रमुखांनी प्राथमिक शाळांचे पर्यवेक्षण हे अधिकारी बनून नव्हे, तर एक मार्गदर्शक मित्र म्हणून करावयाचे असते. केंद्र प्रमुखांच्या शाळेत येण्याने शिक्षकांना आनंद व उत्साह वाटायला हवा इतके केंद्र प्रमुखांचे शिक्षणविषयक योगदान चांगले असावे. केंद्र प्रमुखाच्या काम- काजाचे स्वरूप पुढीलप्रमाणे-
(१) केंद्रशाळेच्या परिसरातील शाळांना साधारणपणे दरमहा दोन भेटी देणे.
(२) शाळेला भेट देताना केंद्र प्रमुखाने एक भेट पूर्वसूचना देऊन व एक भेट पूर्वसूचना न देता द्यावी.
(३) केंद्र प्रमुखाने वर्षाच्या प्रारंभीच्या भेटीत वार्षिक नियोजन करण्याबाबत शासनाच्या योजनांची शाळांना माहिती द्यावी.
(४) केंद्र प्रमुखांनी शिक्षकांना अभ्यासक्रम, शैक्षणिक मूल्यमापन, सहशालेय उपक्रम व क्रीडास्पर्धा घेण्याबाबत मार्गदर्शन करावे.
(५) केंद्र प्रमुखांनी दुसरी भेट देताना अगोदर दिलेल्या
मार्गदर्शक सूचनांची कितपत कारवाई झाली आहे, याचा आढावा घ्यावा.
(६) केंद्र प्रमुखांनी केंद्रीय शाळेचे गटसंमेलने आयोजित करावीत.
(७) केंद्र प्रमुखांनी आपल्या भेटीच्या वेळी त्याची नोंद शाळेतील रजिस्टरवर करावी.
(८) केंद्र प्रमुखांनी शाळेला भेट दिल्यानंतर मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यासमवेत शालेय समस्यांबाबत चर्चा करावी. (९) केंद्र प्रमुखाने ग्रामशिक्षण समितीचे सभापती, सदस्य
व पालक यांच्याशी चर्चा करून प्राथमिक शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी कृती कार्यक्रम निश्चित करावा.
(१०) केंद्र प्रमुखाने शाळेला भेट दिल्यानंतर शिक्षकाचे अध्यापन, शाळेतील भौतिक सुविधा व पटनोंदणी यावर विशेष लक्ष केंद्रित करावे.
केंद्र प्रमुखांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या
केंद्र प्रमुखांची प्रशासकीय, कार्यालयीन व शैक्षणिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत-
प्रशासकीय कर्तव्य शाळा भेटी तपासणी व पर्यवेक्षणाबाबत
प्रशासकीय कर्तव्ये
शाळा भेटी, तपासणी व पर्यवेक्षणाबाबत
(१) समूहातील सर्व प्राथमिक शाळा, बालवाड्या अंगणवाड्या, महिला प्रबोधन केंद्र, ग्रामीण वाचनालये, अनौपचारिक शिक्षण केंद्रे, आश्रमशाळा, प्रौढ शिक्षण केंद्र यांना नियमित भेटी देणे.
(२) प्राथमिक शाळा भेटीमध्ये दरमहा किमान एक भेट अचानक (स्थूलमानाने) व एक भेट पूर्वनियोजित असावी. पूर्वनियोजित भेटीच्या वेळी शाळा सुरू होण्यापूर्वी उपस्थित राहून पूर्ण दिवसभराचे कामकाज पाहणे व शाळा सुटल्यावर शिक्षकांची बैठक घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे,
(३) समूहातील सर्व शिक्षक नियमितपणे शाळेत येतात याची समक्ष पडताळणी करणे,
(४) ग्रामशिक्षण समिती व शाळा व्यवस्थापन समितीच्या महिन्यातून किमान दोन बैठकींना उपस्थित राहून मार्गदर्शन करणे. (दर महिन्याच्या वेगवेगळ्या ग्रामशिक्षण समिती/शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीस उपस्थित राहणे.)
(५) ग्रामशिक्षण समिती/शाळा व्यवस्थापन समितीच्या कामकाजाची माहिती घेणे व शाळांना तत्काळ पर्यायी शिक्षकाची व्यवस्था करणे.
(६) अनियमित व कामचुकार शिक्षकांवर योग्य ती कारवाई केली जावी, यास्तव, वरिष्ठांकडे शिफारस करणे.
(७) कोणतीही शाळा शिक्षकांविना राहणार नाही याची दक्षता घेणे व शाळांमध्ये तत्काळ पर्यायी शिक्षकाची व्यवस्था करणे.
(८) समूहातील सर्व शाळांचे अभिलेख, दस्तऐवज, डेडस्टॉक, शैक्षणिक साधने, नोंदवह्या इत्यादी अद्ययावत व सुस्थितीत राहतील यासाठी शाळांना आवश्यक त्या सूचना देणे.
(९) केंद्रातील सर्व शिक्षक शाळेच्या गावी राहतात याची खात्री करणे.
(१०) शाळा सुधार योजना, शैक्षणिक उठाव, सावित्रीबाई फुले दत्तक-पालक योजना, गणवेश वाटप, मुलींचा उपस्थिती भत्ता, पुस्तकपेढी योजना, शालेय पोषण आहार योजना, वैद्यकीय तपासणी इत्यादी कार्यक्रमांचा आढावा घेऊन त्यांची व्याप्ती व उपयुक्तता वाढविण्यासाठी प्रेरक म्हणून काम करणे.
(११) दरवर्षी शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होईल यासाठी आवश्यक ते नियोजन व त्यानुसार कार्यवाही करणे, वैद्यकीय दोष आढळलेल्या विद्यार्थ्यांवर योग्य ते उपचार होतील असे पाहणे.
१२) मुले शाळेत रमावीत याकरिता प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकासाला पोषक असे विविध उपक्रम सर्व शाळांमधून राबविणे.
(१३) गटशिक्षण अधिकारी यांनी सोपविलेल्या शाळांची वार्षिक तपासणी करणे.
कार्यालयीन कर्तव्ये
(१) प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेपूर्वी शाळा भेटीचा संभाव्य कार्यक्रम विस्तार अधिकारी (शिक्षण) यांच्याकडे सादर करणे.
(२) दर महिन्याच्या ५ तारखेपूर्वी मागील महिन्याची मासिक दैनंदिनी, विहित नमुन्यात भेटीच्या सविस्तर अभिप्रायासह विस्तार अधिकारी (शिक्षण) यांच्यामार्फत गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करणे.
(३) केंद्र शिक्षण सल्लागार समितीची दरमहा एखादी बैठक आयोजित करणे व अशा बैठकीत घेतलेल्या निर्णयावर कार्यवाही करणे.
(४) केंद्र प्रमुखांनी कार्यालयाचे दप्तर अद्ययावत ठेवणे. केंद्रशाळेत स्वतःचे हजेरी रजिस्टर व हालचाल रजिस्टर ठेवणे.
(५) केंद्रातील कोणत्याही शाळेच्या ठिकाणी आठवड्या- तून किमान दोन मुक्काम करणे.
(६) प्रत्येक केंद्र प्रमुखाने आपल्या वार्षिक कामाचा तपशीलवार आरसा म्हणून दरवर्षी एक याप्रमाणे केंद्र रजिस्टर ठेवावे व ते नियमित आपल्याबरोबर ठेवावे.
(७) केंद्र प्रमुखांनी केंद्र कार्यालयात शासन निर्णय, परि-
पत्रके यांची अद्ययावत फाईल ठेवणे.
(८) केंद्रातील शाळांसंबंधीच्या विविध योजना, उपक्रमां- बाबतचे मासिक/त्रैमासिक अहवाल विहित कालमयदित गट- शिक्षणाधिकारी यांचेकडे सादर करणे.
(९) दरवर्षी ३० सप्टेंबरच्या विद्यार्थी पटाच्या आधारे शाळानिहाय शिक्षक निश्चित करण्यासाठी विस्तार अधिकारी (शिक्षण) यांना सहकार्य करणे. केंद्राचा ३० सप्टेंबर अखेरचा सांख्यिकीय अहवाल ३० ऑक्टोबरपर्यंत सादर करणे.
(१०) मुख्याध्यापकांचे लॉगबुक प्रत्येक भेटीत तपासणे तसेच मुख्याध्यापक स्वतः अध्यापन करतात का याची पाहणी करणे.
(११) वरिष्ठांकडे करावयाचा पत्रव्यवहार विस्तार अधिकारी (शिक्षण) यांच्यामार्फत करणे.
(१२) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करणे.
(१३) अनधिकृत गैरहजर असणाऱ्या शिक्षकांची माहिती योग्य त्या शिफारशींसह वरिष्ठांकडे पाठविणे.
(१४) समूहातील सर्व शिक्षकांचे गोपनीय अभिलेख लिहिणे, तसेच सदर गोपनीय अभिलेख पुनर्विलोक्नासाठी विस्तार अधिकारी (शिक्षण) यांच्याकडे सादर करणे.
(१५) प्राथमिक शाळांतील चाचण्या / सत्र परीक्षा व क्षमता चाचण्या यांचे व्यवस्थापन करणे.
शैक्षणिक कर्तव्ये
शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासंदर्भातील कर्तव्ये
(१) दरवर्षी शाळेत दाखल करावयाच्या मुलामुलींचे १०० टक्के सर्वेक्षण शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यामार्फत करवून घेणे.
(२) पटनोंदणीचे शाळानिहाय लक्ष्य निश्चित करून ३१ जुलै पूर्वी दखलपात्र मुलामुलींची १०० टक्के पटनोंदणी झाली याची खात्री करणे. ५ टक्के पटनोंदणी प्रत्यक्ष पडताळणे.
(३) ६ ते १४ वयोगटातील एकही मूल शाळेबाहेर राहणार नाही यासाठी संबंधित शिक्षक मुख्याध्यापक, पालक आणि ग्रामशिक्षण समिती/शाळा व्यवस्थापन समिती व सदस्य यांच्यामार्फत विशेष प्रयत्न करणे.
(४) प्रत्येक मूल शाळेत नियमित उपस्थित राहील व शाळेची सरासरी उपस्थिती ९५ टक्क्यांपेक्षा कमी राहणार नाही याची खबरदारी घेणे, यासाठी पालक गटांचे शिक्षकनिहाय नियोजन करून अशा भेटी नियमितपणे होतात याची वेळच्या वेळी पाहणी करणे.
(५) प्रत्येक विद्यार्थी विषयनिहाय किमान अध्ययन क्षमता संपादन करील या दृष्टीने शिक्षकांना उद्दिष्टे ठरवून देणे व त्याची कार्यवाही होत आहे, याबाबत पुढील भेटीत खात्री करणे.
(६) प्रत्येक शाळेत पटनोंदणी, सरासरी उपस्थिती, गळती व स्थगिती यांची लक्ष्ये ठरवून देणे व ती साध्य करण्याचा कटाक्षाने प्रयत्न करणे.
(७) केंद्र परिसरातील दिव्यांग, मागासवर्गीय, आदिवासी, अतिमंद व मुली इत्यादींसाठी असणाऱ्या शासनाच्या इतर अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहे, सुधारगृहे इत्यादींची माहिती पालकांना देऊन पात्र मुलामुलींना त्या त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत व मार्गदर्शन करणे.
(८) वरचेवर गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती घेऊन असे विद्यार्थी उपस्थित राहतील यासाठी संबंधित शिक्षकांवर निश्चित जबाबदारी सोपविणे.
(९) शासनाकडून मिळालेल्या अनुदानाचा अध्यापन व अध्ययन प्रक्रिया आनंददायी होण्यासाठी पुरेपूर वापर करणे.
(१०) केंद्रातील शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाबाबतची जबाबदारी आपल्यावर आहे याचे भान ठेवणे.
अध्यापन व मूल्यमापनविषयक कर्तव्ये
(१) केंद्र प्रमुखाने केंद्रशाळेत आठवड्यातील किमान चार तासिका अध्यापन करणे.
(२) प्रत्येक शाळेतील सर्व मुलामुलींची त्रैमासिक क्षमताधिष्ठित चाचणी घेणे. या चाचणीच्या वेळी ज्यांनी क्षमतांबाबतची संपादणूक केलेली नाही, अशा विद्यार्थ्यांना उपचारात्मक अध्यापन करते.
(३) शासकीय विद्यावेतन प्रवेश परीक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, विषयाच्या बहिस्थ परीक्षा इत्यादी स्पर्धा परीक्षांसाठी मुलांची निवड शाळा सुरू झाल्यानंतर एक महिन्याच्या आत करण्याबाबत शिक्षकांना सूचना देणे व त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल असे पाहणे.
(४) गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने परिसरात असलेल्या माध्यमिक शाळा व इतर शैक्षणिक संस्थांचे आवश्यक ते सहकार्य मिळविणे.
(५) ऑपरेशन ब्लॅकबोर्ड व इतर योजनांतर्गत प्राप्त झालेल्या साहित्याचा योग्य प्रकारे उपयोग होत आहे याची खात्री करणे व आवश्यक तेथे वापराबाबत व निगा ठेवण्याबाबत
मार्गदर्शन करणे.
(६) उपलब्ध साधनांमधून व कमी खर्चात शैक्षणिक साहित्य/स्वयं अध्ययन साहित्य तयार करण्यासाठी केंद्रातील शिक्षकांना मार्गदर्शन करणे, त्यासाठी कृतिसत्र घेणे.
(७) प्रत्येक शाळेत क्षमताधिष्ठित मूल्यमापनाचे रजिस्टर जाईल व ते वेळच्या वेळी भरले जाईल हे पाहणे. ठेवले
(८) सर्व शिक्षकांच्या व मुख्याध्यापकांच्या कार्याचे वर्ष अखेरीस मूल्यमापन करणे. त्या अनुषंगाने गोपनीय अभिलेखात त्याचे प्रतिबिंब उमटेल असे पाहणे. वस्तुनिष्ठपणे गोपनीय अभिलेख लिहिणे.
(९) प्रत्येक शाळेत केंद्र प्रमुखाने आपल्या सूचना नोंदविण्यासाठी २०० पानी फुलस्केप बाऊंड बुक स्वतंत्र रजिस्टर ‘केंद्र प्रमुख लॉगबुक’ म्हणून ठेवावे व त्यामध्ये भेटीच्या वेळी नोंदी कराव्यात.
(१०) सखोल शाळाभेटीच्या वेळी प्रत्येक शिक्षकाने केलेले काम, मुलांची तयारी व मुलांकडून करवून घेतलेले स्वाध्याय, गृहपाठ, प्रयोग इत्यादी बाबी प्रत्यक्ष पडताळून पाहणे (सदर पाहणी वर्गशिक्षक, विषयशिक्षक व शिक्षकनिहाय करावी.
११) सर्व मुख्याध्यापक व शिक्षक आपापली कर्तव्ये योग्य रितीने पार पाडतात किंवा नाही याची वरचेवर पाहणी करून त्यांना त्याबाबत गरजेअंती जाणीव करून देणे.
(१२) रेडिओ, टी.व्ही., टेपरेकॉर्डर, व्हीसीआर, ओव्हरहेड प्रोजेक्टर, संगणक इत्यादी आधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञानाची आपण माहिती करवून घेणे व त्याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन करणे, त्यांची निगा ठेवणे व परिणामकारकता वाढविण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण देणे.
शालेय नियोजनविषयक कर्तव्ये
(१) अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तिका व शिक्षक हस्तपुस्तिका यांच्या आधारे अध्यापन प्रक्रियेचे नियोजन करून घेणे. नियोजना- नुसार कार्यवाहीबाबत खबरदारी घेणे.
(२) शिक्षकाने केलेल्या अध्यापन प्रक्रियेबाबत पाक्षिक/ मासिक आढावा घेणे व राहिलेला अभ्यासक्रम व त्रुटींबाबत सूचना देऊन पूर्तता करून घेणे.
(३) चाचणी परीक्षा व सत्र परीक्षांचे नियोजन करणे व कार्यवाही करणे. (जिल्हा नियोजनाप्रमाणे)
(४) निबंध, गृहपाठ, प्रयोग, प्रात्यक्षिके, निरीक्षणे, स्वाध्याय इत्यादी विद्यार्थ्यांकडून करवून घ्यावयाच्या सर्व कामांचे शालेय वर्षाच्या सुरुवातीलाच इयत्तानिहाय व वर्षनिहाय भौतिक लक्ष्य ठरवून द्यावे व भेटीच्या वेळी त्याच्या अंमल- बजावणीबाबत कटाक्षाने लक्ष देणे व ५ टक्के कामाची पडताळणी भेटीच्या वेळी स्वतः करणे.
(५) शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी शिक्षकांची गट- संमेलने, मेळावे, चर्चासत्र, कृतीसत्र, उद्बोधन वर्ग, नमुनापाठ, स्नेहसंमेलने इत्यादी महिन्यातून एकदा आयोजित करावी. त्यांचे वार्षिक नियोजन करावे. त्यास केंद्र सल्लागार समितीची मान्यता घ्यावी. त्यासाठी स्वतंत्र रजिस्टर ठेवून त्यामध्ये शिक्षकांची उपस्थिती व थोडक्यात कार्यवृत्तांत नोंदवावेत.
(६) समूहातील सर्व शाळा स्तरावर, आंतरशालेय स्तरावर सहशालेय कार्यक्रमाचे नियोजन करून घ्यावे. शक्य तेथे शाळा एकत्र करून विविध खेळ, सांस्कृतिक स्पर्धा घ्याव्या व विद्यार्थी / शाळांना बक्षिसे व प्रमाणपत्रे द्यावीत.
(७) जिल्हा परिषद, शासन व स्थानिक पातळीवरून आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे प्रभावी नियोजन, आयोजन व कार्यवाही करणे.
(८) विविध राष्ट्रीय सण, सांस्कृतिक कार्यक्रम, बालसभा इत्यादीचा वार्षिक आराखडा तयार करून त्यानुसार सर्व शाळांत कार्यवाही करून घ्यावी.
(९) शासन व जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीच्या स्वरूपात आवश्यक ती कार्यवाही करणे. योजनेची माहिती घेणे. लाभार्थी निवडणे, त्यांना वेळेवर योजनेचा लाभ देणे व नियमित अहवाल पाठविणे.
(१०) दरवर्षी समूहातील शाळांची प्रतवारी वस्तुनिष्ठपणे निश्चित केली आहे किंवा नाही ते पाहणे, प्रतबारी उंचाविण्याचा प्रयत्न करणे, त्यासाठी शाळांना मार्गदर्शन करणे,
(११) प्रत्येक प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी व शाळेने दर महिन्यात कोणकोणती शैक्षणिक कामे करावयाची याची सुरुवातीलाच माहिती देणे व त्यानुसार कार्यवाही करून घेणे.
(१२) पालक मेळावे, माता मेळावे, शिबिरे, नवसाक्षर मेळावे इत्यादी आनुषंगिक मेळाव्यांचे आयोजन करणे व मार्गदर्शन करणे.
(१३) शाळा सुधार योजना, शैक्षणिक उठाव, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, गणवेश वाटप, पुस्तक पतपेढी योजना, उपस्थिती भत्ता, शालेय पोषण आहार इत्यादी कार्यक्रमांचा आढावा घेऊन त्यांची व्याप्ती व उपयुक्तता वाढविण्यासाठी प्रेरक म्हणून काम करणे.
(१४) केंद्रांतर्गत शाळांतील घटक शाळांचे सहशालेय उपक्रमांचे वार्षिक नियोजन करून घेणे.
(१५) शैक्षणिक वर्षारंभीच शाळा व शिक्षकनिहाय वर्ग व विषय वाटप करून देणे.
(१६) केंद्रांतर्गत शाळांतील सर्व शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी वार्षिक नियोजन करणे.
(१७) केंद्रांतर्गत शाळांमधील १०० टक्के विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी नियोजन व पाठपुरावा करणे.
(१८) विद्यार्थी व शिक्षक यांचेसाठी शारीरिक शिक्षण- विषयक प्रशिक्षण आयोजित करणे.
(१९) शिक्षकांचे वार्षिक शैक्षणिक स्नेहसंमेलन आयोजित करणे.
केंद्र संमेलनाचे आयोजन
केंद्र प्रमुखांनी केंद्र संमेलनाचे आयोजन पुढीलप्रमाणे करावे.
(१) प्रत्येक केंद्र संमेलन महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या शनिवारी घ्यावे किंवा अर्ध्या सुट्टीचा दिवस असेल त्या दिवशी घ्यावे.
(२) शैक्षणिक वर्षातील केंद्र संमेलन आयोजित करावयाचे महिने- जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी व मार्च.
(३) सदर केंद्र संमेलनासाठी केंद्रातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या मान्यताप्राप्त शाळांतील इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी च्या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांना सहभागी करून घ्यावे
(४) केंद्र संमेलन हा सेवांतर्गत प्रशिक्षणाचाच एक भाग असल्यामुळे केंद्रातील इयत्ता ५ वी ते ८ वी च्या माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक/उपमुख्याध्यापक/पर्यवेक्षक व शिक्षक यांची उपस्थिती अनिवार्य आहे.
(५) शिक्षक संख्या ७०-७५ पेक्षा अधिक असल्यास दुसरा वर्ग करण्यात यावा. दुसऱ्या वर्गाच्या कामकाज व संनियंत्रणासाठी केंद्र समन्वयक/साधन व्यक्ती यांची मदत घ्यावी.
(६) केंद्र संमेलनाच्या दिवशी शाळा सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत घ्यावी. त्यानंतर केंद्र संमेलनास उपस्थित राहावे. केंद्र संमेलनाची वेळ स. ११.३० ते ४.३० राहील.
(७) केंद्र संमेलनाची नियोजित शाळा प्रवासाच्या दृष्टीने सोयीची होईल अशी निवडावी. या नियोजित शाळेत संमेलनासाठी आवश्यक अशा भौतिक सुविधा असाव्यात.
(८) प्रत्येक संमेलनाचा दिनांक व स्थळ सर्व शाळांना वेळीच कळविणे तसेच केंद्र संमेलनाच्या वार्षिक नियोजनाची प्रत गटशिक्षण अधिकारी कार्यालयास देण्यात यावी. गटशिक्षण अधिकारी यांनी तालुक्याच्या केंद्र संमेलनाचे नियोजन प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांना कळवावे.
(९) केंद्र संमेलनाचे प्रशासकीय प्रमुख संबंधित केंद्राचे केंद्र प्रमुख राहतील.
(१०) नियोजित विषयासाठी तज्ज्ञ म्हणून केंद्रातील अनुभवी / कल्पक मुख्याध्यापक, स्रोत व्यक्ती / तज्ज्ञ शिक्षक यांना निवडावे. तसेच आवश्यकतेनुसार बाहेरील तज्ज्ञ बोलवावेत.
(११) केंद्र संमेलनासाठी येताना शिक्षकांनी आवश्यक पाठ्यपुस्तके व संदर्भसाहित्य, मार्गदर्शिका इत्यादी साहित्य सोबत आणावे.
(१२) प्रत्येक केंद्र संमेलनात एका Ice Breaking ची योजना करावी. Ice Breaking शक्यतो ५ व्या तासिकेच्या सुरुवातीला घ्यावे. Ice Breaking विषयांशी सुसंगत घेण्यात येऊ नयेत.
(१३) केंद्र संमेलनात कोणतेही सत्कार समारंभ, निरोप समारंभ घेण्यात येऊ नयेत.
(१४) केंद्र संमेलनाच्या आयोजक शाळेने शैक्षणिक साहित्य,
ग्रंथ प्रदर्शन, विशेष उपक्रम व प्रकल्पांचे प्रदर्शन आयोजित करावे. (१५) प्रत्येक केंद्र संमेलनात शैक्षणिक विषयावर आधार- लेल्या एका पुस्तकावर चर्चा होणे अपेक्षित आहे. त्यासाठी
प्रत्येक केंद्र संमेलनाच्या शेवटी एका पुस्तकाचे नाव वाचनासाठी सांगावे व पुढील केंद्र संमेलनात परिपाठाच्या तासिकेनंतर त्याचा परिचय आढावा, चर्चा घेण्यात यावी. अधिक माहिती- साठी पुस्तकांची यादी दिलेली आहे.
(१६) केंद्र संमेलनाच्या दिवशी कोणीही रजेवर जाऊ नये व कोणाचीही रजा मंजूर करण्यात येऊ नये.
(१७) प्रत्येक केंद्र संमेलनाच्या शेवटच्या तासिकेला जीवन शिक्षण अंकातील टर्निंग पॉइंट, शिक्षकांशी हितगुज, उपक्रम, शासननिर्णय इत्यादी वाचन करावे व चर्चा करावी.
(१८) प्रत्येक शिक्षक व मुख्याध्यापक यांनी केंद्र संमेलना- साठी स्वतंत्र नोंदवही ठेवावी व वर्गात येणाऱ्या वैविध्यपूर्ण अनुभवांची आपल्या वहीमध्ये नोंद करावी. केंद्र संमेलनाच्या शेवटच्या तासिकेत या नोंदवहीचे वाचन करावे व त्यावर चर्चा करावी.
(१९) केंद्राच्या हस्तलिखितामध्ये शाळेतील/वर्गातील नाविन्यपूर्ण विविध उपक्रम, विद्यार्थ्यांशी संबंधित टर्निंग पॉइंट, वेगळी मुले, स्वरचित काव्ये, कथा या संदर्भातील शिक्षकांचे अनुभव यांचा प्रामुख्याने समावेश करावा.
(२०) प्रत्येक संमेलनात शंकापेटी ठेवावी व त्या शंकांचे निरसन पुढील संमेलनात न चुकता करावे.
(२१) परिपाठ, पुस्तक परिचय, नमुना पाठ यांच्या कार्यवाहीविषयी माहे जुलैच्या केंद्र संमेलनाच्या नियोजनात सविस्तर माहिती दिली आहे. त्याप्रमाणे उर्वरित महिन्यांच्या संमेलनांमधून माहे जुलैच्या नियोजनाप्रमाणे कार्यवाही करावी.
(२२) संमेलनामध्ये वेळेच्या उपलब्धतेनुसार शैक्षणिक माहितीपट दाखवावेत.
(२३) माझी समृद्ध शाळा यामध्ये शाळेच्या श्रेणीचा विचार करून पुढील श्रेणीमध्ये जाण्यासाठी शाळेचे अल्पकालीन व दीर्घकालीन नियोजन करून घ्यावे. त्याप्रमाणे श्रेणीमध्ये वाढ होईल, अशी कार्यवाही करावी.
(२४) माहे ऑगस्टमध्ये सर्व शाळांच्या दैनंदिन निरीक्षण नोंदीचे वाचन घ्यावे. यासाठी सहाध्यायी मूल्यमापन करून चर्चा करावी. केंद्र प्रमुख/साधन व्यक्ती/ तज्ज्ञ यांनी मार्गदर्शक सूचना कराव्यात व त्याप्रमाणे शिक्षकांनी पुढील नोंदींमध्ये त्यांची दखल घ्यावी.
(२५) केंद्र प्रमुखांनी प्रत्येक केंद्र संमेलनाचा अहवाल डायट प्राचार्यांना व गटशिक्षण अधिकारी यांना त्वरित पाठवावा. (२६) प्रत्येक शिक्षकाने स्वतः एक प्रकल्प तयार करणे अनिवार्य आहे.
नियोजन समिती
(१) प्रमुख : केंद्र प्रमुख/साधन व्यक्ती/पर्यवेक्षक (मनपा)
(२) सचिव : केंद्रातील ज्येष्ठ मुख्याध्यापक/शिक्षक
(३) सदस्य : एका माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक
(४) सदस्य : एक पदवीधर शिक्षक
(५) सदस्य : एक उपशिक्षक
(६) सदस्य : केंद्रातील साधन व्यक्ती
(टीप : ज्या ठिकाणी केंद्र प्रमुख हे पद रिक्त असेल, त्या ठिकाणी केंद्र संमेलन नियोजनाबाबत साधन व्यक्ती काम पाहतील)
ज्या केंद्रामध्ये पात्र मुख्याध्यापक नसतील त्या केंद्रात सचिव म्हणून ज्येष्ठ शिक्षक काम पाहतील.
नियोजन समितीची कामे
(१) प्रशिक्षण स्थळ/शाळा निश्चित करून सर्व सहभागी शाळांना कळविणे.
(२) केंद्र संमेलनांच्या वार्षिक नियोजनानुसार संबंधित तज्ज्ञ मार्गदर्शकांना निमंत्रित करणे.
(३) केंद्र संमेलनाच्या ठिकाणी सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे.
(४) केंद्र संमेलनाच्या आवश्यकतेनुसार संगणक, एसीडी प्रोजेक्टर, रेडिओ, दूरचित्रवाणी संच, सीडी प्लेअर यांसारखी शैक्षणिक साधने उपलब्ध करून देणे.
(५) केंद्र संमेलनासाठी उपस्थिती पत्रक ठेवणे. तसेच पूर्ण कार्यक्रमाच्या इतिवृत्ताची नोंद ठेवणे.
(६) केंद्र संमेलनासाठी आर्थिक जमाखर्च व अभिलेखे वित्तीय नियमांनुसार ठेवणे.
(७) प्रत्येक केंद्र संमेलनाच्या शेवटी पुढील केंद्रसंमेलनाचे नियोजन करणे.